कोरोना : अंतिम विजय आपलाच!

Foto
कोरोनाच्या निमित्ताने  केवळ आपला भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगावर अभूतपूर्व असे संट कोसळले आहे. या संकटापासून कोणालाही पळून जाता येणार नाही. तुमच्या मनात असो, नसो, या संकटाशी सामना तुम्हाला करावाच लागणार आहे. एक वेगळ्याच प्रकारचे युद्ध कोरोनाच्या रुपाने जगासमोर उभे राहिले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री देशवासीयांना संबोधित केल्यानंतर या संकटाचे गांभीर्य देशवासीयांना समजले असेल यात शंका नाही. कोरोना हे प्रकरण अत्यंत वेगळे आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला. या महायुद्धाने अनेक प्रश्‍न निर्माण केले. त्यातून बाहेर पडण्यासाठी जगाला बराच काळ झगडावे लागले हे खरे असले तरी संपूर्ण मानवजातीला कोरोना एवढा धसका त्यावेळीही बसलेला नव्हता. आपल्या देशाने प्लेगसारखा संसर्गजन्य रोगामुळे होणार्‍या हानीचा अनुभव घेतलेला आहे. परंतु आतापर्यंतच्या सर्व अनुभवापेक्षा कोरोनाचा अनुभव हा फार वेगळा आणि भयानक आहे. याचे विषाणू हवेत  नसले तरी ज्या पद्धतीने त्याचा फैलाव होतो त्याला अटकाव करण्याचे सामर्थ्य आज जगामध्ये नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल  कोरोनाच्या निमित्ताने जनतेसमोर मांडलेली भूमिका अत्यंत नेटकी म्हणावी लागेल. केंद्र, राज्य सरकारे आणि त्यांच्या अखत्यारीतील प्रत्येक विभाग आज कोरोनाच्या संकटाशी झुंज देताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा उल्‍लेख मुद्दाम करावा लागेल. टोपे यांची वृद्ध आई मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिलटलमध्ये  दाखल असताना हा मंत्री 24 तास आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी उपलब्ध राहतो. कोरोनाच्या संदर्भात प्रत्येक बारीक -सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असतो.  लोकांच्या  शंका-कुशंकांना उत्तर देण्यासाठी तत्पर असतो हे दृश्य मनाला उभारी देणारे आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी हातावर पोट असलेल्या लोकांच्या उदरभरणाचा विचार करावा आणि त्या दृष्टीने त्यांना मदत देण्याची योजना करावी हे कौतुकास्पद आहे. एरव्ही राजकारण्यांवर नेहमी टीकाच करीत आलो आहोत, त्या पार्श्‍वभूमीवर  अशाप्रसंगी त्यांचे कौतुकही झाले पाहिजे या मताचे आम्ही आहोत.  सरकारी पातळीवर प्रत्येक विभाग आपले योगदान देत असताना सर्वसामान्य जनतेनेही समजुतदारपणे वागून त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे एखादे संकट स्वत:वर येऊन ठेपत नाही तोपर्यंत जबाबदारीने कसा व्यवहार करावा याचे भान आपल्याला नसते. या पार्श्‍वभूमीवर आपण किती  कसोशीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे याची जाणीव व्हायला हरकत नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. अतिशय झपाट्याने आजूबाजूच्या व्यक्‍तींना तो चिकटतो असा आतापर्यंतचा अनुभव असल्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी गर्दी टाळण्याचा सल्‍ला दिलेला आहे. त्याचप्रमाणे अगदीच आवश्यकता नसेल तर प्रवास टाळण्याचे, एकत्र न येण्याचे तसेच सभा, समारंभ टाळण्याचे आवाहन सरकारी पातळीवरुन करण्यात येत आहे. त्याला निश्‍चित असा आधार आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन करावयाचा आहे. देशवासीयांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही परंतु गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे, पुढील काही आठवड्यांपर्यंत टाळावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. रविवार, दिनांक 22 रोजी जनता कर्फ्यूचा प्रयोग पंतप्रधानांनी सूचवला आहे. या प्रयोगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. 130 कोटी देशबांधवांना एका संकल्पाच्या निमित्ताने एकत्र आणले तर कोणत्याही  संकटाशी  दोन हात करणे सहज शक्य आहे  ही त्यामागची धारणा आहे.  हाच धागा पुढे रविवारी संध्याकाळी पाच वाजता सर्व देशवासीयांनी कोरोनाशी रात्रं-दिवस दोन हात करणार्‍या यंत्रणेचा  गौरव करण्यासाठी, आभार व्यक्‍त करण्यासाठी घराबाहेर येऊन पाच मिनिटे टाळ्या वाजवाव्यात असे  पंतप्रधानांनी सुचवले आहे. त्यामागेही ‘हम सब एक़’ हीच भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लोकशक्‍तीचा  जागर करण्यासाठी  एक प्रकारचा यज्ञ सुरु केला  असे म्हटले तर ते जास्त योग्य ठरेल. कोरोनामुळे निर्माण होणारे प्रश्‍न दीर्घकाळ  संपूर्ण जगाला त्रासदायक ठरणारे आहेत यात वाद नाही. सामाजिक, आर्थिक, सर्वच क्षेत्रांत कोरोनाचे दुरगामी परिणाम होणार आहेत. भारताची अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पुढील दहा-वीस वर्षे नवनवीन प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत. सामाजिक-राजकीय क्षेत्रातही याचे   पडसाद उमटणार आहेत. हे निश्‍चित. मात्र आज या संकटातून देशवासीयांचे प्राण वाचवणे जास्त  महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच हा सर्व आटापिटा सुरु आहे. आपण सर्व एकजुटीने आलेल्या संकटाशी दोन हात करुयात, अंतिम  विजय आपलाच आहे.